पुण्यात उच्चशिक्षित तरुणांकडून गांजा विक्री, २७ किलो अमली पदर्थांसह ३ तरुणांना अटक
पुणे – पुण्यातील तीन तरुणांकडून २७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे गांजा विक्री करणारे तिघेही उच्चशिक्षित आहेत. पुण्यातील कात्रजजवळ आंबेगाव बुद्रूक परिसरात ही घटना घडली. गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या स्थापत्य अभियंत्यासह तीन उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या तरुणांकडून २७ किलो गांजासह तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हरीओम संजय सिंग, करण युवराज बागूल (रा. धुळे) आणि वसंत सुभाष क्षीरसागर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागूल स्थापत्य अभियंता असून क्षीरसागरचे शिक्षण बी.बी.ए.पर्यंत झाले आहे. तर सिंग हा इलेक्ट्रिशियन आहे. कात्रज येथील भारती विद्यापीठाजवळ दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सिंग आणि बागूल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २३ किलो गांजा जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान हे दोघे त्यांचा पुण्यातील साथीदार क्षीरसागर याच्याकडे गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आंबेगाव परिसरातून क्षीरसागरला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून सुमारे साडेचार किलो गांजा जप्त करण्यात आला.