अट्टल गुन्हेगार असिफ दाढी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
पुणे – नुकतीच पुण्यातील गुंड गजा मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीला काही दिवसांचा कालावधी उलटताच थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पिंपरी-चिंचवड मधील अट्टल गुन्हेगार गेल्याचा फोटो समोर आला. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
का घेतली अजित पवार यांची भेट? असिफ दाढी याने अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. तो एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे गेला असल्याची माहिती मिळत आहे. असिफ दाढी हा तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेशी जोडलेला असल्याचेही समजत आहे.
असिफ दाढीची ३६ वर्षे गुन्हेगारी विश्व
असिफ दाढी याच्यावर सन १९८८ मध्ये मारहाणीचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेच मारहाणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. सन १९९६ मध्ये त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. सन २००२ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. सन २००४ मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल झाला. सन २००७ मध्ये खुनासाठी अपहरण आणि खून असा गुन्हा दाखल आहे. सन २००९ आणि सन २०११ मध्ये शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. सन २०२१ साली त्याच्यावर अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला त्याच्या घरातून शस्त्रासह अटक केली होती.
गुंडांच्या भेटीगाठी?
नुकतीच पुण्यातील गुंड गजा मारणे याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भेट घेतली होती. या भेटीवरून मोठे वादंग निर्माण झाले. ही भेट चुकीची असल्याचे खुद्द अजित पवार यांनी सांगितले होते. तसेच आपण याबाबत काळजी घेऊ, असेही त्यांनी आश्वस्त केले असताना त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने भेट घेतली. या भेटीला अवघे काही तास उलटले असतानाच आणखी एका नेत्याच्या भेटीला अट्टल गुन्हेगार गेल्याचा फोटो समोर आला आहे.त्यामुळे कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना सांगितले होते की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला गुन्हेगार बनायला मजबूर केले आहे तसेच शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत महाराष्ट्रात गुंडांची पैदास होईल असे जाहीर निवेदन केले होते, अलीकडे घडत असलेल्या घटना संशयास्पद असल्याचे चित्र दिसत आहे.