मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदारास १५ लाखांची लाच स्वीकारताना अटक
ठाणे – मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने ५० लाख रुपये लाचेची मागणी केली, त्यापैकी १५ लाख रुपये लाच घेताना भाईंदर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गणेश वणवे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे तर महेंद्र शेलार असे पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.
तक्रारदार व त्याचे अशील यांना गुन्ह्यात जामीन मिळवून देणे, अटक न करणे अशा प्रकारची मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी तक्रारदार यांचेकडे ५० लाख रु. लाचेची मागणी केली व तडजोअंती ३५ लाख रु. घेण्याची तयारी दाखवून पहिला हप्ता म्हणून १५ लाख रु. पोलीस हवालदार गणेश वणवे यांनी स्वीकारला असता त्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार व हवालदार गणेश वणवे या दोघांविरुद्ध मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.