दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक
आटपाडी पोलिसांची खरसुंडी हद्दीत कारवाई
सांगली – खरसुंडी हद्दीत दरबार हॉटेलजवळ अवैधपणे देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तासगाव येथील दोघांना एक लाख सहा हजार, ५४० रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले.याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस हवालदार प्रमोद रोडे, शंकर पाटील, उमर फकीर यांना गुप्त माहितीच्या आधारे खरसुंडी गावचे हद्दीत नेलकरंजी ते खरसुंडी जाणाऱ्या रस्त्यावर अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी खरसुंडी येथील दोन पंचासह जाऊन पाहणी केली असता त्यावेळी अमन साजिद शेख रा. बेंद्री रोड, तासगाव व अनिकेत चंद्रकांत राक्षे रा. पुणदी रोड, तासगाव हे नेलकरंजीकडून स्कुटीवर स्कुटीच्या पुढील मोकळ्या जागेत सिमेंटच्या पोत्यात व दोघांच्या मध्यभागी बॉक्समध्ये काहीतरी घेऊन येत असल्याचे आढळून आल्यानंतर खरसुंडी हद्दीतील दरबार हॉटेल त्यांना थांबवण्यात आले व ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे पांढऱ्या पोत्यात रॉयल संत्रा कंपनीची ३५०० रुपये किमतीची देशी दारू, विदेशी मॅकडॉल व्हिस्कीचे १४,४०० रु. किंमत असलेले दोन बॉक्स,रॉयल स्टॅग व्हिस्कीचा ८६४० रु. किंमतीचा एक बॉक्स आढळून आला. पोलिसांनी या मालासह ८० हजार रुपयेची सिल्वर रंगाची सुझुकी कंपनीची स्कुटी दुचाकी क्र.एम.एच.१०ईबी ६८६२ व दोघांना ताब्यात घेतले.या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.