धुळ्यात ऑनलाईन गंडा; आरोपींना सायबर पोलिसांनी केले जेरबंद

Spread the love

धुळ्यात ऑनलाईन गंडा; आरोपींना सायबर पोलिसांनी केले जेरबंद

धुळे – साक्री तालुक्यातील दहिवेलच्या एका नोकरदाराला ५० लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष दाखवून सुमारे १० लाखांचा गंडा घातला होता. याप्रकरणी फिर्यादीने धुळे सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली असता आरोपींना जेरबंद करण्यात धुळे सायबर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाखांची रोकड व ६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. अजय शिवाजी पाटील यांना बजाज फायनान्स लि. कंपनीच्या मॅनेजरचा फोन कॉल आला होता. त्याने ५० लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष दाखविले. यावर विश्वास ठेवून अजय पाटील व त्यांच्या वहिनीने ९ लाख ९९ हजार ३०० रुपये जमा केले. मात्र, पैसे भरुनही कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजय पाटील यांनी पोलीस ठाणे गाठले.

धुळे सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले आहे. यासाठी सायबर पोलिसांनी मुंबई, ठाणे, शिर्डी व कल्याण येथून विवेक विनोद सिंग व शिवम राजू जयस्वाल यांना १ जानेवारी रोजी ताब्यात घेतले होते. त्यांनी गुन्ह्यातील मास्टर माइंड प्रल्हाद गजानन वाठोडकर हा असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लागलीच सायबर पोलिसांचे पथक वाठोडकरच्या मागावर पाठविले. पोलिसांचा ससेमीरा लागताच त्याने नाशिकहून शिर्डीच्या दिशेला पळ काढला. धुळे पोलिसांनी २ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता शिर्डी येथून प्रल्हाद वाठोडकरला अटक केली. त्यानेही आणखी दोघांची नावे पोलिसांना सांगीतली. त्यावरुन ६ जानेवारीला ठाणे येथून अविनाश हनुमंत वांगडे व गोळेगाव ता. जुन्नर जि.पुणे येथून सागर विजय माळी याला ९ जानेवारी रोजी जेरबंद केले. या आरोपींनी ऑनलाईन गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदरची धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि धनंजय पाटील, पोउनि. कोठुळे, असई जगदिश खैरनार यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon