गोळ्या घातल्या तरी बेहत्तर, आरक्षणाशिवाय आता माघार नाही ; मनोज जरांगे-पाटील 

Spread the love

गोळ्या घातल्या तरी बेहत्तर, आरक्षणाशिवाय आता माघार नाही ; मनोज जरांगे-पाटील 

छत्रपती संभाजीनगर– सरकारच्या डोक्यात जे आहे, ते सरकार करतंय. जनतेच्या मनातलं सरकार करत नाही. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याची आमची भूमिका आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे असे लाखो पुरावे आहेत. मग कशाला आम्हाला फुफाट्यात ढकलताय? मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट समाजाला ओबीसीतील हक्काचे आमचे आरक्षण द्यावे. सरकार धरसोड करतंय. सरकार आरक्षण देईल असं वाटत नसल्याने आम्ही मुंबईला चाललोय. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. मराठा समाज इतका घरातून बाहेर पडणार आहे की, गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले की, मुंबईला गेल्यावर आता माघारी नाही. मी जे जे बोललो ते केले आहे. मी माझ्या समाजासाठी पूर्ण ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे. वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालेल.जर ही संधी गेली तर मराठा पोरांचे खूप हाल होणार आहेत. आरक्षण मिळाले नाही तर भविष्यात खूप नुकसान होणार आहे. मराठ्यांनी सावध व्हा, सर्वांनी घरे सोडा. आज केले नाही तर कधीच होणार नाही. नाईलाज असल्याने आम्हाला मुंबईला यावे लागणार आहे. मराठ्यांनो घरी बसू नका.

आपल्या लेकरांसाठी आरक्षण घ्यायचे आहे. २० तारखेपासून अंतरवालीतून पायी निघायचे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचे नाही असं आवाहन त्यांनी केले. त्याचसोबत प्रकाश शेंडगे ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागतोय. शेंडगेंनी गोरगरीब धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी शक्ती पणाला लावावी. मराठा समाजही त्यांच्यासोबत आहे. विनाकारण त्यांनी शक्ती वाया घालवू नये. ते चळवळीतून आलेले नेते आहेत. त्यांच्याविषयी आणखी काय बोलणार नाही अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे. मराठा समाजाने ठरवलंय, आपण आहोत तोपर्यंत लेकरांना आरक्षण मिळवून द्यायचे. सरकारला काय करायचे ते करावे. गुन्हे दाखल करून सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाठ थोपटून घ्यायची असेल. सरकारनं शहाणे व्हावे. मराठ्यांशिवाय काही होऊ शकत नाही हे सरकारनं समजून घ्यावे. जर खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाज दबला असता तर बीडमध्ये लाखोंचा जनसागर उसळला नसता. विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाची नाराजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओढावून घेऊ नये. कोणतेही ट्रॅक्टर रोखू नका. अंतरवालीसारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. कोट्यवधी मराठा एकत्र आलाय त्यामुळे ते सरकारला जड जाईल असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, मी पण हिंदू आहेच. मराठा आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. राम मंदिराचे उद्घाटन त्यावेळी आहे. हा प्रत्येकाच्या आनंदाचा सोहळा आहे. १८ तारखेपर्यंत मुंबईत १४४ लागू आहे त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत जाणार हे घोषित केले. २० तारीख केवळ सरकार ५ महिने आरक्षण लांबवत आहे म्हणून धरली आहे असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon