खबरदार…दारु पिऊन गाडी चालवाल तर! वाहतूक पोलिस निरीक्षक गिरीश बने यांचा इशारा
कल्याण, डोंबिवली व कोळसेवाडी परिसरात वाहतूक विभागाकडून मद्यपान चाचणी
विशेष प्रतिनिधी
कल्याण – कल्याण, डोंबिवली व कोळसेवाडी परिसरात थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मद्य प्रश्न करून नशेतच वाहन चालविण्याच्या घटना अधिक घडतात. यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मद्यपी चालकांविरुद्ध पोलिसांनी तीव्र मोहीम सुरू केली असून त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवाल तर खबरदार असा इशाराच वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांना दिला आहे. नवीन वर्ष तीन दिवसांवर येऊन ठेपले असून कल्याण, डोंबिवली परिसरात रात्री उशिरापर्यंत दारूच्या पार्ट्या ठिकठिकाणी आयोजित केल्या जातात. थर्टी फर्स्टच्या रात्री तर मद्य प्रश्न करून नशेतच वाहन चालविण्याच्या घटना अधिक घडतात. यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार पोलिसांच्या वतीने ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली आहे.
मध्यंतरी चालकाने मद्य प्राशन केल्याचा संशय आल्यास त्याची रुग्णालयात नेऊन रक्त तपासणी केली जात होती. आता मात्र अल्कोटेस्ट चाचणी केल्यावर जागेवरच दारू घेतल्याचे कळणार असल्याने मद्यपी चालकांची आता खैर नाही. त्यामुळे वाहनचालकांनी दारू पिऊन गाडी चालवू नये, असे आवाहन वाहतूक वरीष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी केले आहे. बार, हॉटेल्स, पबनेही ग्राहकांना याबाबत सूचित करावे, असे पोलिसांनी म्हटले आहे.