मुंबईतील चुनाभट्टी परिसर भरदिवसा गोळीबाराने हादरला ; १ मृत तर ४ जखमी

Spread the love

मुंबईतील चुनाभट्टी परिसर भरदिवसा गोळीबाराने हादरला ; १ मृत तर ४ जखमी

मुंबई – मुंबईत दिवसाढवळ्या हा गोळीबार झाल्याने शहरात पुन्हा एकदा गँगवार सक्रिय झालाय का? अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच चुनाभट्टीतील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चुनाभट्टी येथील व्हीएन पुरव मार्गावरील आझाद गल्लीमध्ये साडे तीनच्या सुमारास गोळीबार झाला. ही गल्ली अत्यंत चिंचोळी आहे. या गल्लीत १५ ते १७ पेक्षा जास्त राऊंड फायरिंग झाल्याची माहिती आहे. गोळीबार करून आरोपी फरार झाले आहेत. या गोळीबारात एकजण ठार झाला असून तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाचं नाव पप्पू येरुणकर असं आहे. इतर दोघांची नावे समजली नाही. पोलीस त्यांची माहिती घेत आहेत.

पोलिसांकसून चौकशी सुरू

जखमींमध्ये एक नामचीन गुंड असल्याचं सांगण्यात येत आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरच पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या सापडल्या आहेत. या गोळ्या रस्त्यावर पडल्या होत्या. त्या ठिकाणी पोलिसांनी राऊंड केला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांची कसून चौकशी सुरू केली आहे. फेरीवाले, दुकानदार आणि इतरांकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पूर्व वैमनस्यातून गोळीबार

जुन्या वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण गोळीबार कुणी केला याची माहिती मिळाली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. हल्लेखोरांचा निशाणा कुणावर होता याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. जखमींना भेटून पोलीस त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.

गोळीबाराच्या आवाजाने लोक घाबरून सैरभैर पळू लागले

दरम्यान, अचानक गोळीबार झाल्याने स्थानिक लोकही घाबरले. गोळीबाराचा आवाज आल्याने लोक घाबरून गेले आणि आपल्या घरात लपले. काहींची पळापळ सुरू झाली. गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसर सील केला आहे. कुणालाही आझाद गल्लीत जाऊ दिलं जात नाही. या भागात स्मशान शांतता पसरली आहे.

गोळीबारातील मयत व जखमी

सुमित येरुणकर, वय ४६ वर्ष (मयत) असून त्याच्या पोटाला आणि डाव्या खांद्याला अशा दोन गोळया लागल्या आहेत तर रोशन निखिल लोखंडे, वय ३० वर्ष हा जखमी आहे, त्याच्या उजव्या मांडीला १ गोळी लागली आहे तसेच मदन पाटील, वय ५४ वर्ष, जखमी असून त्याच्या डाव्या काखेत १ गोळी लागली आहे,तर आकाश खंडागळे, वय ३१ वर्ष हा जखमी असून त्याच्या उजव्या हाताच्या दंडावरती १ गोळी लागली आहे तर त्रिशा शर्मा, वय ८ वर्ष ही देखील जखमी असून तिच्या उजव्या हाताला गोळी लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon