पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत अशा आविर्भावात असणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई, पालघरमध्ये तब्बल २४ घरफोड्या केल्यानंतर त्याचं टार्गेट पिंपरी-चिंचवड,
वाकड – मुंबई शहरात ६ आणि पालघर जिल्ह्यात १८ घरफोड्या केलेल्या चोरट्याला काही काळ अटकही झाली, पण त्यानंतरही न सुधारता त्याने चक्क शहरच बदलले. पिंपरी-चिंचवडमध्ये आपल्याला कोणीही ओळखणार नाही आणि पोलीस आपल्यापर्यंत पोहचू शकत नाहीत, या आत्मविश्वासाने त्याने पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीही केली आणि पालघर येथील घरी जाऊन बसला, मात्र वाकड पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला त्याच्या घरात जाऊन त्याला बेड्या ठोकल्या. अब्दुल उर्फ चिरा इद्रीस शेख (वय ४७, रा. अलकापुरी, नालासोपारा (पूर्व) जि. पालघर) असे अट्टल आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार धर्मेश रामआचरे दिवाकर (वय २८, रा. अलकापुरी, नालासोपारा (पूर्व) जि. पालघर) याला देखील अटक करण्यात आली आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शंकर कलाटेनगर वाकड येथील प्रिस्टीन प्रोलाईफ या सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरील बंद घराच्या गॅलरीमधून येत चोरट्याने घरफोडी केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अमेय विजय बिर्जे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही इमारत उंच असताना पाचव्या मजल्यावर गॅलरीमधून येत हा गुन्हा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. पोलीस अंमलदार स्वप्नील लोखंडे, विनायक घार्गे आणि भास्कर भारती यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत तसेच तांत्रिक विश्लेषण करून घटनास्थळी दोघेजण रिक्षातून आले असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून त्यांचा माग काढत वाकड पोलिसांनी थेट पालघर जिल्ह्यातील नालासोपारा शहर गाठले. तिथून अब्दुल शेख आणि धर्मेश या दोघांना अटक केली.आरोपींकडून एक लाख २२ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत
आरोपी अब्दुल शेख हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने मुंबई आणि पालघर जिल्ह्यात तब्बल २४ घरफोड्या केल्या आहेत. त्यात त्याला अनेकदा अटक देखील झाली आहे. तिथे वारंवार अटकेची कारवाई होत असल्याने तसेच पोलिसांच्या डोळ्यावर आल्याने त्याने पिंपरी-चिंचवड शहराकडे मोर्चा वळवला. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात घरफोड्या केल्यास आपल्याला कोणीही ओळखणार नाही. तसेच आपण पालघर येथे राहण्यास असल्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, असा विचार करून आरोपीने वाकड येथे घरफोडी केली. मात्र वाकड पोलिसांनी पहिल्याच गुन्ह्यात आरोपीला अटक केली.
असा गाठला पाचवा मजला
१६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या कालावधीत ही घरफोडी घडली होती. आरोपी धर्मेश हा रिक्षा चालक आहे. ते दोघेजण रिक्षातून वाकड येथे आले. त्यानंतर त्यांनी प्रिस्टीन प्रोलाईफ फेज नंबर एक या सोसायटीची घरफोडी करण्यासाठी निवड केली. अब्दुल हा सुरुवातीला धर्मेश याच्या खांद्यावर चढून इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीमध्ये गेला. तिथून त्याने एसी, गॅलरी, खिडकीचे स्लॅब, पाईप यांचा आधार घेत पाचवा मजला गाठला.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार विभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार संदीप गवारी, वंदु गिरे, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडित (परिमंडळ-२) यांनी केली.