कल्याणमध्ये भररस्त्यात विद्यार्थ्यांला मारहाण करून लुटले
कल्याण – शहरात वाढणारी गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे, तरीसुद्धा कधी कोयता गँगची दहशत तर कधी बिझनेसकडून बायको-मुलाची हत्या. गुन्ह्याच्या विविध आणि हादरवणाऱ्या घटनांमुळे कल्याण शहर गेल्या काही दिवसांपासून बरंच चर्चेत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. कल्याणमधीलच कोळसेवाडी परिसरात एका पान टपरी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला लुटल्याची घटना ताजी असतानाच असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिम येथे भररस्त्यात एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याची घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून हजारो रुपयेही लुटण्यात आले.
नीरज भोलानाथ यादव असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा अंबरनाथ येथील रहिवासी आहे. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस चौक ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. नीरज हा मूळचा अंबरनाथ मधील असून कल्याणमध्ये कॉलेजसाठी येतो. मंगळवारी रात्रीच्या सुमारासा तो घरी जायला निघाला असता शहाड जकात नाका येथे तो रिक्षाची वाट पहात असताना तेवढ्यात तिथे तिघेही आरोपी आले आणि त्यांनी जबरदस्तीने नीरजला त्यांच्या बाईकवर बसवले. नीरज तिथे एकटाच असल्याने तो विशेष प्रतिकार करू शकला नाही. आरोपींनी त्याला जबरदस्तीने म्हारळ गावाजवळील टेकडीवर नेले आणि तेथे त्याला बेदम चोप दिला. एवढचं नव्हे तर तीनही आरोपींनी त्याला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि नीरज याच्याकडे असलेले डेबिट कार्ड ताब्यात घेऊन जवळच्याचा एटीएममधून पैसे काढले. तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि पाकिटातील रोख रक्कमही आरोपींनी हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला. हल्लेखोरांच्या ताब्यातून सुटल्यावर नीरजने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात जाऊन तेथील अधिकाऱ्यांना घडलेला सर्व प्रकार सांगून तीन आरोपींविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दैनिक पोलीस महानगर शी बोलताना सांगितले.