ऐन दिवाळीत एसटी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता : सोमवारपासून एसटी कर्मचारी संपावर

Spread the love

ऐन दिवाळीत एसटी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता : सोमवारपासून एसटी कर्मचारी संपावर

मुंबई – ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते  यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने आजपासून संपाची हाक दिली आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत नविन समिती स्थापन करावी, त्या समितीसमोर कर्मचाऱ्यांचे मत मांडण्याची सुविधा देण्यात यावी, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या दोन प्रमुख मागण्या गुणरत्न सदावर्ते यांनी केल्या आहेत. याशिवाय एसटी महामंडळातील सुमारे ८५ टक्के बस नादुरुस्त असल्याने रस्त्यावर चालण्यास अयोग्य आहेत. अनेक गाड्यांचे इन्शुरन्स नाहीत, त्यामुळे गाड्या रस्त्यावर चालविणे धोक्याचे असून ते प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना ४८ टक्के महागाई भत्ता दिला आहे. परंतु अद्याप थकबाकी दिलेली नाही. ती लवकरात लवकर देण्यात यावी, सोमवार सकाळपासून रस्त्यावर एकही एसटी धावणार नाही आणि त्या दिवसाचा पगार मात्र महामंडळाला कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.यामुळे ऐन दिवाळीत राज्यातील एसटीची वाहतूक विस्कळित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले.मागील काही महिन्यापासून एसटी महामंडळाकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. त्याच्या परिणामी एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून जादा वाहतूक चालवली जाते.

त्यामुळे गणेशोत्सवानंतर दिवाळीच्या हंगामात एसटीच्या महसुलात वाढ होत असते. अशातच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिवाळीत संप पुकारल्यास एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon