पुण्यातील सोसायटीत लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे शहरातील एका प्रसिद्ध परिसरातील सोसायटीमध्ये सोमवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. खेळता खेळता लिफ्टमध्ये गेलेल्या एका चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील निम्बजनगर येथील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. शिवांश शैलेश धूत असे या ७ वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. शिवांश रात्री १० च्या सुमारास सोसायटीच्या परिसरात इतर मुलांसोबत खेळत होता. खेळता खेळता तो अचानक लिफ्टमध्ये गेला. त्याने लिफ्टमधील बटण दाबले आणि लिफ्ट सुरू झाली, मात्र दुसऱ्या मजल्यावर पोहोचण्यापूर्वीच लिफ्ट अचानक मध्येच अडकली. शिवांश बराच वेळ बाहेर न आल्याने आणि तो कोठेही दिसत नसल्याने सोसायटीतील रहिवाशांना संशय आला.
रात्री साडेअकराच्या सुमारास या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर लिफ्टमधून शिवांशला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचा असा अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून लिफ्टमध्ये कोणताही मोठा तांत्रिक बिघाड प्राथमिक तपासात आढळून आलेला नाही. संबंधित लिफ्टची नियमित देखभाल सोसायटीमार्फत केली जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.