कल्याण रेल्वे स्थानकात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी सौरभ सोनावणे अटक
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : पुण्यातील नसरापूर प्रकरणाची धक्कादायक आठवण अद्याप ताजी असतानाच मुंबई उपनगरातील कल्याण रेल्वे स्थानकात आणखी एक नारकीय घटना घडली आहे. कल्याण रेल्वे यार्डात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने मुलीचा मोबाईल फोन हिसकावून घेत तिला ‘पोलिस स्टेशन’ च्या बहाण्याने यार्डात नेले आणि अत्याचार केला. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सौरभ सोनावणे याला तातडीने अटक केली आहे.
ही अल्पवयीन मुलगी अहिल्यानगरमधून आपल्या मामाच्या घरी खोपोलीला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती. त्यावेळी सौरभ सोनावणे याने तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. मुलीने मोबाईल परत मागितल्यावर आरोपीने ‘मोबाईल हवे असेल तर माझ्यासोबत पोलिस स्टेशनला चल’ असे सांगून तिला फसवले. त्यानंतर तो तिला कल्याण रेल्वे यार्डात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
मुलीने कशीबशी आरोपीच्या तावडीतून सुटका करून रेल्वे पोलीस ठाणे गाठले आणि सारा प्रकार सांगितला. रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी सौरभ सोनावणे याची ओळख पटवली आणि त्याला अटक करण्यात आली.
ही घटना कल्याण रेल्वे स्थानकासारख्या नेहमी गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी घडल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकात कोणालाही कळले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमदार राजेश मोरे यांची फास्ट ट्रॅक कोर्ट आणि फाशीची मागणी
या घटनेची दखल घेत स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “अशा नराधमांना सवय झाली आहे. बहिणी-आयाांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून या आरोपीला फाशी द्यावी,” अशी मागणी आमदार मोरे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे याबाबत लेखी मागणी करण्याची घोषणा केली आहे.
रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण करणारी ठरली आहे.