शनी अमावस्येच्या पूजेला गेलेल्या मित्र-मैत्रिणीचा भोंदूबाबाच्या मठात दुर्दैवी अंत; धुळ्यात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
धुळे : राज्यात भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या घटनांमुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असतानाच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. शनी अमावस्येच्या रात्री विशेष पूजाविधीसाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीची हत्या करून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जयश्री रजनीकांत काकुस्ते (२५) आणि अक्षय गंगाधर सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. जयश्री एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत होती, तर अक्षय ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम करत होता. त्याचबरोबर तो कुटुंबाच्या केबल व्यवसायातही हातभार लावत होता.
शनिवारी सकाळी निजामपूर परिसरातील रायपूर-भडगाव मार्गावरील टेंबे फाट्याजवळ एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे तोंड रुमालाने बांधलेले होते आणि मृतदेहावर दुचाकी टाकण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीला हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान घटनास्थळी सापडलेला केसरी रंगाचा रुमाल पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला. श्वान पथकाने या रुमालाच्या आधारे थेट भोंदूबाबा योगेश ऊर्फ भैय्या बापू खैरनार यांच्या मठापर्यंत माग काढला. पोलिसांनी संशयावरून खैरनार याला ताब्यात घेत चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
जयश्रीचे काका संजय हिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जयश्री आणि अक्षय हे दोघे शनी अमावस्येच्या निमित्ताने विशेष पूजेसाठी खैरनार यांच्या आश्रमात गेले होते. पूजाविधीदरम्यान काही कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपीने अक्षयच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर जयश्रीचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
गुन्ह्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने वेगळी कहाणी रचल्याचेही उघड झाले आहे. जयश्रीवर दुसरा व्यक्ती हल्ला करत होता आणि तिला वाचवताना झटापटीत अक्षयचा मृत्यू झाला, असा बनाव आरोपीने केला होता. मात्र तपासात हा दावा खोटा ठरला.
अक्षयचा मृतदेह आश्रमाजवळील उंबरांडी परिसरातील वनक्षेत्रात पुरल्याची कबुली आरोपीने दिली. विशेष म्हणजे मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात आला होता. घटनास्थळी आढळलेल्या चाकांच्या खुणांमुळे पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा मिळाला. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणाहून अक्षयचा मृतदेह ताब्यात घेतला.
या प्रकरणी भोंदूबाबा योगेश ऊर्फ भैय्या बापू खैरनार याला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.