मुलांकडून घरफोड्या; चोरीचा माल विकणारे वडीलही जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण परिसरात अल्पवयीन मुलांकडून घरफोड्या करून घेत चोरीचा सोन्या-चांदीचा माल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात एका १९ वर्षीय तरुणासह त्याच्या वडिलांना आणि आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली असून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. आरोपींकडून सुमारे २१ लाख ६० हजार रुपये किमतीचे १८ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी रामबाग लेन क्रमांक ४, कल्याण पश्चिम येथील रहिवासी एम. अरविंद राजाराम पै (वय ४९) यांनी ८ मे रोजी घरफोडीची तक्रार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कैलास विलास भालेराव (वय १९, रा. मोहने, आंबिवली) याला १३ मे रोजी अटक केली. त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी धक्कादायक माहिती दिली. आरोपींचे वडील विलास भालेराव आणि दीपक जाधव हे विविध सोसायट्यांमध्ये कामाच्या निमित्ताने फिरत असताना बंद घरांची रेकी करीत. त्यानंतर ही माहिती मुलांना देऊन घरफोड्या घडवून आणल्या जात असल्याचे उघड झाले.
आरोपी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम व दागिने चोरी करत असत. चोरीतील रोख रक्कम मौजमजेसाठी खर्च केली जात होती, तर सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी वडिलांकडे दिले जात असल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार विलास प्रकाश भालेराव (वय ३८) आणि दीपक अशोक जाधव (वय ४०) यांना १५ मे रोजी अटक करण्यात आली.
पोलिसांच्या पुढील तपासात या टोळीने कल्याण परिसरातील आणखी तीन घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील एकूण चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होणमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलिरामसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजय नाईक आणि त्यांच्या तपास पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास मडके करीत आहेत.