प्रेमसंबंधातून खंडणीचा कट; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये टाकला, मुंब्रा पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

प्रेमसंबंधातून खंडणीचा कट; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये टाकला, मुंब्रा पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे : प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून खंडणी उकळण्याचा कट रचत प्रियकराची निर्घृण हत्या करून मृतदेह ड्रममध्ये भरून गटारीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंब्रा पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करत मृताच्या प्रेयसीसह तिच्या भावाला अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे.

अरबाज मकसुदअली खान (रा. मुंब्रा) हा ३ एप्रिल २०२६ रोजी दादर येथे कामाचे पैसे घेण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र तो घरी परतला नाही. यानंतर त्याचे वडील मकसुद अली खान यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मानव मिसिंग रजिस्टर क्रमांक ९६/२०२६ अन्वये बेपत्ता नोंद करण्यात आली होती.

पोलीस उपनिरीक्षक सावंत हे तपास करत असताना अरबाजच्या मोबाईल कॉल डिटेल्सचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यात त्याचा मोबाईल शेवटचा वसईतील भोईदापाडा परिसरात सक्रिय असल्याचे समोर आले. त्याच दिवशी अरबाजची प्रेयसी मेहजबीन हिचेही मोबाईल लोकेशन वसईत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला.

मेहजबीनला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल चौकशीत तिने पती हसन, भाऊ तारीक शेख आणि मित्र मोज्जम तालीब पठाण यांच्या मदतीने अरबाजची हत्या केल्याची कबुली दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी अरबाजला वसई येथे बोलावून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास असमर्थ ठरल्यानंतर त्याचे हातपाय बांधून प्लास्टिकच्या पाइपने मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून वालीव पोलीस ठाणे हद्दीतील निर्जन नाल्यात फेकून देण्यात आला.

या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १४०, ३(५), १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक शरद कुंभार आणि त्यांच्या पथकाने तपास करत आरोपी तारीक शेख याने दाखविलेल्या ठिकाणावरून मृतदेह ताब्यात घेतला.

मेहजबीन खातून इकरान शेख आणि तिचा भाऊ तारीक इकरान शेख यांना ७ मे रोजी अटक करण्यात आली असून त्यांना १४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मेहजबीनचा पती हसन आणि मोज्जम तालीब पठाण हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon