मुख्यमंत्र्यांची विधानभवनात ‘रॉयल’ एंट्री, पण बुलेटची पीयुसी एक्सपायर; काँग्रेस खासदाराकडून कागदपत्रं समोर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बुधवारी केवळ २ गाड्या घेऊन घराबाहेर पडले होते. तर, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही बुधवारी पालखी मार्गावर चक्क बसने प्रवास केला. तसेच, आपल्या ताफ्यातील ५० टक्के गाड्या कमी करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चक्क बुलेटवरुन प्रवास केला, विधानभवनात येताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत दुचाकी गाड्यांचा कमी ताफा दिसून आला. मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीवरुन आता विरोधकांनी टीका टिपण्णी सुरू केलीय. तर, मुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या बुलेटची पीयुसीची देखील मुदत संपल्याचं काँग्रसने समोर आणलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी थेट दुचाकीवरून विधान भवन गाठल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः ‘रॉयल एनफिल्ड ३५०’ ही बाईक चालवत विधान भवनात दाखल झाले. विशेष म्हणजे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीवरुन आता राजकारण तापलं आहे.
मुंबईतील काँग्रेस नेत्या तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीतील चूक शोधून काढली. कारण, मुख्यमंत्र्यांनी जी बुलेट विधानभवनात येण्यासाठी वापरली होती, त्या बुलेटची पीयुसीची मुदत संपल्याचं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका करताना, एक्सायरडं माल अशा शब्दात राहुल गांधी हे राजकारणातील एक्सपायरडं माल असल्याचं म्हटलं होतं. आता, वर्षा गायकवाड यांनीही तोच धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. विधानभवनात येण्यासाठी वापरलेल्या बुलेटची पीयुसी एक्स्पायर झाली होती, त्याच अनुषंगाने, तर “Expired Maal” चालतं का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या साधनेसाठी, स्टंटसाठी ज्या वाहनाची निवड केली, त्याचे पीयूसी मुदतबाह्य झालेलं होतं, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रेही शेअर केली आहेत.