काव्य, कृतज्ञता आणि गुणवंतांचा सन्मान; ‘कृतार्थ’ व ‘रत्नाक्षरे’ प्रकाशन सोहळा उत्साहात

काव्य, कृतज्ञता आणि गुणवंतांचा सन्मान; ‘कृतार्थ’ व ‘रत्नाक्षरे’ प्रकाशन सोहळा उत्साहात

रवि निषाद / मुंबई

मुंबई : शारदा प्रकाशन आणि भायखळा म.न.पा. शाळा माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री दया घोंगे लिखित ‘कृतार्थ’ आणि ‘रत्नाक्षरे’ (द्वितीय आवृत्ती) या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा ९ मे रोजी डोंबिवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या सोहळ्याचे प्रकाशन प्रा. विसुभाऊ बापट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सौ. उमा बापट, डॉ. संतोष राणे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सौ. उमाताईंनी दोन्ही पुस्तकांचे अभ्यासपूर्ण आणि सखोल विवेचन करत जवळपास सर्व कवितांचा परिचय रसिकांना करून दिला. तसेच साहित्यप्रेमींनी ही पुस्तके आवर्जून वाचावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘मातीतील मोती’ हा विशेष सत्कार समारंभ पार पडला. सामान्य परिस्थितीतून पुढे येत स्वकर्तृत्वावर यश संपादन केलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त रवींद्र दौंडकर, किशोर शिंदे आणि डॉ. गोरक्ष धोत्रे यांचा दया घोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘शाळेच्या वास्तूची माती पवित्र असते. त्याच मातीतून घडलेले हे बहुमोल मोती आहेत,’ अशा शब्दांत दया घोंगे यांनी गौरवोद्गार काढले. ‘शिष्यात् इच्छेत् पराजयम्’ या संस्कृत उक्तीचा संदर्भ देत शिष्याच्या यशातच गुरूचे खरे समाधान दडलेले असते, असे त्यांनी नमूद केले.

तिसऱ्या सत्रात ‘गुण गौरव’ कार्यक्रमांतर्गत अध्यापन क्षेत्रात कार्यरत शिक्षक तसेच विविध कलागुण जोपासणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्राजक्ता कुलकर्णी, मंजिरी पैठणकर, पद्माकर भावे, गायत्री रॉय, कैलास बडगुजर, मंजुषा बुरुजवाले, स्वाती नातू, रवींद्र कारेकर, संपत वरे, शमिका केळकर आणि वर्षा पाटील यांचा गौरव करण्यात आला. तसेच निरपेक्ष सेवावृत्तीबद्दल आनंद खेडकर आणि संजय ताम्हाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात रवींद्र कारेकर यांच्या सरस्वती वंदनेने झाली, तर शमिका केळकर हिने सादर केलेल्या राष्ट्रवंदनेने उपस्थितांची मने जिंकली. वर्षा पाटील यांनी मान्यवरांचा, तर माधुरी डोंगरे यांनी दया घोंगे यांचा परिचय करून दिला. आनंद खेडकर यांच्या खुसखुशीत सूत्रसंचालनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. मंजिरी पैठणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दया घोंगे यांची मुलगी उन्नती आणि सून स्वाती यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon