केडीएमसी प्रशासनाचा अजब कारभार! 

केडीएमसी प्रशासनाचा अजब कारभार! 

डोंबिवलीतील ३५ वर्षांपूर्वीची इमारत आता अवैध ठरवली; आयुक्तांचा पाडकामाचा आदेश, २९ कुटुंब बेघर होणार

योगेश पांडे / वार्ताहर 

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील श्यामा प्रसाद मुखर्जी रोडलगत असलेल्या भावना इमारतीला कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने तातडीने खाली करण्याची नोटीस बजावली आहे. ३५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही इमारत आता अवैध ठरवण्यात आली असून, २९ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या नोटिसीनंतर हवालदिल झालेल्या रहिवाशांनी बुधवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. तोंडावर पावसाळा असताना आम्ही आता जायचं कुठं, असा संतप्त सवाल रहिवाशांनी प्रशासनाला केला.

इमारतीतील रहिवासी किंजल मायशेरी यांनी सांगितले की, महापालिकेने २००२ सालीही इमारत पाडण्याची नोटीस बजावली होती. त्याविरोधात रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि न्यायालयाने पाडकामाला स्थगिती दिली होती. दरम्यान, कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आलेली विरोधातील स्वतंत्र याचिका मागे घेतल्यानंतर पूर्वीचा स्थगिती आदेश रद्द झाल्याचं मानलं गेलं. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी महापालिकेने पुन्हा कारवाई सुरू केली.

किंजल मायशेरी यांनी सांगितले की, त्या खासगी कंपनीत काम करतात. त्यांच्या कुटुंबात गरोदर बहीण, ज्येष्ठ नागरिक आई आणि हृदयविकाराने त्रस्त वडील आहेत. अशा परिस्थितीत अचानक घर खाली करण्याची वेळ आल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर आम्ही आणि आमच्यासारखी २९ कुटुंबे नेमकी कुठे जाणार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

महापालिकेच्या नोटिशीत बांधकाम नियमांचे पालन न करता इमारत उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच रहिवाशांचा कब्जा बेकायदेशीर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. महापालिकेच्या मते, सध्या या इमारतीबाबत कोणताही न्यायालयीन स्थगिती आदेश अस्तित्वात नाही. त्यामुळे रहिवाशांनी १५ दिवसांच्या आत इमारत खाली करणे आवश्यक आहे, असं महापालिकेचं म्हणणं आहे.

प्रारंभी दिलेली १५ दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिकेने आणखी सात दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत इमारत रिकामी न केल्यास पोलीस बंदोबस्तात पाडकाम केलं जाईल. या कारवाईपूर्वी इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल, तसेच पाडकामाचा खर्चही रहिवाशांकडून वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.३५ वर्षांपासून राहत असलेल्या घरांवर आता बुलडोझर चालणार असल्याने भावना इमारतीतील रहिवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. कायदेशीर लढाई सुरू असतानाच अचानक आलेल्या या नोटिशीमुळे सर्व कुटुंबांपुढे निवारा आणि सुरक्षिततेचे गंभीर संकट उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon