NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची कारवाई तीव्र; पुण्यात अभियांत्रिकी विद्यार्थ्यास अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे : देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची व्याप्ती वाढवत कारवाया गतीमान केल्या आहेत. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतल्यानंतर आता फुरसुंगी परिसरातून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, नाशिकमधील संशयित शुभम खैरनार यांच्या घराची झाडाझडती घेत त्याच्या भावालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
NEET २०२६ परीक्षेतील कथित गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)ने ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द केली आहे. नव्याने परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली असून त्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. परीक्षा रद्द झाल्यानंतर सीबीआयने तपासाचा वेग वाढवला असून या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी नाशिकमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून मनीषा वाघमारे या ४६ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आले. संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असून विद्यार्थ्यांना मुख्य आरोपींपर्यंत पोहोचविण्याचे काम तिने केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी फुरसुंगी परिसरातून अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याच्याकडून सध्या चौकशी सुरू असून अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. पुढील तपासासाठी त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणात नाशिकमधील संशयित शुभम खैरनार यांच्या नांदगाव येथील निवासस्थानी सीबीआय आणि नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत झाडाझडती घेतली. तपासादरम्यान अधिकाऱ्यांकडून गोपनीयता पाळण्यात आली होती. एका महिला अधिकाऱ्यासह सात ते आठ सदस्यांच्या पथकाने कुटुंबीयांची तासभर चौकशी केली. शुभमचा भाऊ भावेश खैरनार यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर त्याला सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.