काल्हेरमध्ये देहव्यापारावर गुन्हे शाखेची धाड ; महिला दलाल अटकेत, दोन पीडितांची सुटका

काल्हेरमध्ये देहव्यापारावर गुन्हे शाखेची धाड ; महिला दलाल अटकेत, दोन पीडितांची सुटका

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : भिवंडीतील काल्हेर परिसरात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने धाड टाकून एका महिला दलालाला अटक केली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली.

गुन्हे शाखेला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की, “हॉटेल वंश किचन, फॅमिली रेस्टॉरंट अॅन्ड बार” परिसरात एक महिला दलाल असहाय्य महिलांना फूस लावून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत आहे. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने काल्हेर येथील एकविरा कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचला.

कारवाईदरम्यान संबंधित महिला दलालाला दुपारी सुमारे ४.३५ वाजता ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने उल्हासनगर-५ येथील शांतीसदन येथे ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १४३ (१), १४३ (३) तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ च्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे यांच्यासह पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon