इरशाळवाडी ट्रेकदरम्यान डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू
पोलीस महानगर नेटवर्क
खालापूर : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळ इरशाळवाडी येथे ट्रेकदरम्यान डोंबिवलीजवळील कोपरगाव येथील २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. रितेश कोणका असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा आपल्या मित्रांसोबत इरशाळवाडी येथे ट्रेकसाठी गेला होता. ट्रेकदरम्यान अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच तो बेशुद्ध पडल्याने मित्रांनी तातडीने स्थानिक ग्रामस्थ आणि खालापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्परता दाखवत पारंपरिक झोळीच्या साहाय्याने रितेशला डोंगरावरून खाली आणले. पायथ्याशी सज्ज ठेवलेल्या रुग्णवाहिकेतून त्याला चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.