भोंदू अशोक खरात प्रकरणात ‘४ मंत्र्यांचा सहभाग’; नाना पटोले यांचा खळबळजनक दावा

भोंदू अशोक खरात प्रकरणात ‘४ मंत्र्यांचा सहभाग’; नाना पटोले यांचा खळबळजनक दावा

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांनी राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. या प्रकरणातील कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “अशोक खरातकडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे आम्ही आधीपासून सांगत आहोत. विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता. या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा थेट संबंध आहे. त्याबाबतचे पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. संबंधित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून तत्काळ वगळावे, ही आमची मागणी आहे.”

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “राज्यात भीतीचं वातावरण राहिलेलं नाही. त्यामुळे भोंदू बाबा आणि राजकीय गुंड यांना बळ मिळत आहे. अशा घटना सातत्याने घडत राहण्यामागे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा कारणीभूत आहे,” असा आरोप त्यांनी केला. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचाही उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान, पटोले यांच्या दाव्यानंतर ‘ते चार मंत्री नेमके कोण?’ याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशोक खरात याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत अनेक महिलांची फसवणूक व अत्याचार केल्याचे आरोप आहेत. काही महिलांनी पुढे येत त्याच्याविरोधात गंभीर आरोप केले असून, काही व्यावसायिकांनी आर्थिक फसवणुकीचाही दावा केला आहे.

या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. वाढत्या दबावानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon