कल्याणमध्ये मुस्लिम नागरिकांना घर विकण्यास नकार दिल्याने एमआयएमचे कल्याण शहराध्यक्ष अश्फाक शेख यांचा संताप; सखोल चौकशीची मागणी
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – मुस्लिम आहात मग घर मिळणार नाही, यानंतर वाद वाढला अन् थेट पोलीस स्टोशनमध्ये पोहोचला. हा वाद कल्याणमध्ये झाला आहे. कल्याणमध्ये एका रिअल इस्टेट संदर्भातील फोन कॉलवरून नवा सामाजिक वाद उफाळून आला आहे. मुस्लिम नागरिकांना घर विकण्यास नकार दिल्याने एमआयएमचे कल्याण शहराध्यक्ष अश्फाक शेख यांनी संताप व्यक्त केला. शिवाय थेट पोलीस ठाणे गाठले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणानंतर वातावरण तापले आहे.
शुक्रवारी दुपारी अश्फाक शेख यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. कोनगाव परिसरातील महामार्गालगत एका गृहप्रकल्पात स्वस्त दरात घरे उपलब्ध असल्याची माहिती या व्यक्तीने दिली. घराची किंमत आणि इतर तांत्रिक बाबींवर चर्चा झाल्यानंतर शेख यांनी विचारले, “या ठिकाणी मुस्लिम व्यक्तीला घर मिळेल का?” यावर समोरून “नाही, मुस्लिमांना घर दिले जात नाही,” असे उत्तर मिळाल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. तसे त्यांनी आपल्या तक्रारीत ही म्हटले आहे. मुस्लिमांना या सोसायटीमध्ये घर विकले जाणार नाही असं समोरच्या वक्तीने सांगितले.
या उत्तराने संतप्त झालेल्या शेख यांनी तातडीने कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर लेखी तक्रार दाखल केली. “माझे नाव आणि ओळख माहिती असतानाही अशा प्रकारे भेदभाव करणारे विधान का केले गेले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित व्यक्ती कोणत्या बिल्डरसाठी काम करत होती आणि त्या प्रकल्पाचे नाव काय, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाय अशा पद्धतीचे वक्तव्य जाणीव पूर्व केले आहे का असं ही ते म्हणाले. यातून जातीय तेढ निर्माण होते असं ही त्यांनी सांगितलं.
धार्मिक भेदभावाचा हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत शेख यांनी कारवाईची मागणी लावून धरली आहे. आता या प्रकरणात तो फोन करणारा व्यक्ती कोण होता. त्यामागे कोणत्या बिल्डरची मानसिकता आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. कल्याणमध्ये सदनिका विक्रीच्या व्यवहारात धार्मिक भेदभाव केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मात्र एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, संबंधित टेलिमार्केटिंग एजन्सीची माहिती काढली जात आहे.