मुलीला पळवल्याची भयंकर शिक्षा; मनसे पदाधिकाऱ्यांनी मुलाच्या घरासह वाहनांची केली राख
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – प्रेमप्रकरण, प्रेमविवाहाच्या रागातून हत्या, मारहाण झाल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. मुलाने- मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने सैराटसारख्या ऑनर किलिंगच्या घटनाही बऱ्याचदा घडतात. अशाच प्रकारची हादरवणारी घटना पुण्याच्या राजगड तालुक्यात घडली आहे. मुला मुलीने पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून मुलीकडच्या संतापलेल्या नातेवाईकांनी मध्यरात्री मुलाचे घर आणि ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना राजगड तालुक्यातील सुरवड गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुला – मुलीने पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून भयंकर घटना पुण्याच्या राजगड तालुक्यातील सुरवड गावात घडली आहे. मुलगा आणि मुलगी पळून गेल्यानंतर मुलीकडच्या संतापलेल्या नातेवाईकांनी मध्यरात्री थेट मुलाचे घर आणि ट्रॅक्टर पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्हा मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची ही मुलगी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या मनसे पदाधिकाऱ्याची मुलगी ही सुरवड गावातील एका मुलासोबत पळून गेली. त्यामुळे मनसे पदाधिकारी असलेल्या मुलीच्या कुटुंबियांना राग अनावर झाला. याच रागातून मनसेच्या पदाधिकाऱ्यानी मध्यरात्री २ वाजता नातेवाईक आणि २५ ते ३० साथीदारांसह मुलाच्या घरी आले. या जमावाने मुलाचे घर आणि गाडी जाळल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये याबाबत कुठलेही तक्रार दाखल झालेली नाही. याबाबत राजगडमधील वेल्हा पोलीस स्टेशनमध्ये मुलाच्या घरचे तक्रार करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात याबाबतचे नेमके सत्य समोर येईल. दरम्यान, या आगीमध्ये मुलाचे घर पूर्णपणे जळाले आहे तसेच ट्रॅक्टरचीही राख झाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.