कराटे प्रशिक्षकाचा नऊ वर्षांच्या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमध्ये एका संतापजनक घटना घडली आहे. ज्या प्रशिक्षकावर पालकांनी आपल्या मुलीच्या सुरक्षेची आणि प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवली होती, त्याच कराटे प्रशिक्षकाने एका नऊ वर्षांच्या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण असून, या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने इतरही काही मुलींसोबत असं कृत्य केल्याचा दाट संशय आता व्यक्त केला जात आहे.
कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गिरीश वाघमारे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित नऊ वर्षांची मुलगी याच्याकडे कराटेचे धडे गिरवत होती.
दोन दिवसांपूर्वी आरोपीने इतर मुली सरावासाठी आल्या आहेत असं सांगून पीडितेल आपल्या घरी बोलावलं. मात्र, मुलगी घरात गेल्यावर तिथे कोणीही नसल्याचं पाहून आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
पीडित मुलीने घरी गेल्यावर आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. विशेष म्हणजे, आरोपीने यापूर्वीही तिच्यासोबत अशाच प्रकारचं कृत्य केल्याची माहिती मुलीने दिली. हे ऐकून संतप्त झालेल्या पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी थेट आरोपीचं घर गाठलं आणि आपला रोष व्यक्त केला.या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपी गिरीश वाघमारे याला ताब्यात घेतलं.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. केवळ ही एकच मुलगी की आरोपीने प्रशिक्षणासाठी येणाऱ्या इतरही अल्पवयीन मुलींसोबत असे प्रकार केले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीच्या या कृत्यामुळे क्रीडा क्षेत्रात आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.