ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट; ठाणे जिल्ह्यात १४ मेनंतर पाणीकपात बंधनकारक
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे : अल-निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवली जात असताना ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. बारवी आणि आंध्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि एमआयडीसी क्षेत्रांत १४ मेनंतर पाणीकपात बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता किरण बोडके यांनी दिली.
बारवी धरणात सध्या १२९.८२ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३८.७२ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक असून आंध्रा धरणात १३६.६२ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४०.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणांतून ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच घोडबंदर, कळवा, मुंब्रा, कौसा आदी भागांना पाणीपुरवठा केला जातो.
पाणीसाठ्यातील घट लक्षात घेऊन संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी पाणी व्यवस्थापन सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली शहरात ११ मेपासून दर सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत बारवे, नेतिवली, मोहिली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद राहणार आहेत.
प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.