नवी मुंबईकरांचा प्रवास हायटेक होणार; ताफ्यात २८५ नव्या बसेस, प्रवाशांना मिळणार ‘डबल डेकर’ची भेट

नवी मुंबईकरांचा प्रवास हायटेक होणार; ताफ्यात २८५ नव्या बसेस, प्रवाशांना मिळणार ‘डबल डेकर’ची भेट

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – मुंबईनंतर आता नवी मुंबईतही डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसच्या ताफ्यामध्ये तब्बल २८५ नवीन बसेस दाखल केल्या जाणार आहेत. अलीकडेच परिवहन सेवेच्या बैठकीमध्ये नवीन बस खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ करण्यासाठी आणि प्रवाश्यांचा प्रवास अधिक दर्जेदार करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

डिझेल बसेस टप्प्याटप्प्याने बाद होत गेल्यामुळे महानगर पालिका क्षेत्रामध्ये बसेसचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे एनएमएमटीच्या बसेसच्या ताफ्यामध्ये नवीन बस दाखल होणार आहे. इंधनाच्याही दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आणि पर्यावरणामध्ये होत असलेल्या प्रदुषणाच्या वाढीमुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएनजी बसेस १००, इलेक्ट्रिक बसेस २५ आणि ग्रॉस कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट (जीसीसी) मॉडेलवर १५० बसेस भाडे तत्त्वावर चालवल्या जाणार आहेत.

अशा पद्धतीने एकूण २८५ बसेस एनएमएमटी क्षेत्रामध्ये बसेस चालवल्या जाणार आहेत. इतकंच नाही तर, यापूर्वी सुद्धा मंजुर झालेल्या १०० बसेस येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये एनएमएमटीच्या बसेसच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहे. नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या अनुषंगाने बसेसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, उलवे, ऐरोली, ठाणे- बेलापूर मार्ग आणि शीव- पनवेल महामार्गावरील प्रवासी संख्या लक्षात घेऊन बसेसचे नियोजन करण्यात येणार आहे.

ज्या मार्गांवर कमी प्रवासी संख्या आहेत, त्या मार्गांमध्ये बदल करून प्रवासी संख्या कशा पद्धतीने वाढली जाईल, याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात येणार आहे. नवी मुंबई क्षेत्रामध्ये डबल डेकर एसी बस सुद्धा प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, १० डबल डेकर बसेस सुरू करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon