नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी

नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी

योगेश पांडे / वार्ताहर 

नाशिक – नाशिकमधील टीसीएस कंपनीमधील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. निदा गरोदर असल्याने तिच्या आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी न्यायलयाने दिली आहे. पोलिस कोठडी दरम्यान दररोज सकाळी ११ ते ११:१५ वाजता आणि सायंकाळी ५ ते ५:१० ह्या दररोज दोन वेळेत आईला भेटण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे. गेल्या ४० दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. मध्यरात्री अटकेची कारवाई केल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी नाशिकरोड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने निदा खानला ११ मे पर्यंत चार दिवस पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, निदाच्या ४० दिवसांच्या पळापळीचा अखेर अंत झाला आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी राबवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि वेगवान मोहिमेत निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. निदाने अटकेपासून वाचण्यासाठी अत्यंत नियोजनबद्धरीत्या छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनी निवडली होती. हे लोकेशन इतके दुर्गम होते की, ती ज्या इमारतीत लपली होती, तिच्या आजूबाजूला लांबवर एकही घर नव्हते. वर्दळ नसलेला हा निर्जन भाग असल्याने कोणालाही संशय येण्याची शक्यता नव्हती.

नाशिक पोलिसांच्या एसआयटी तपासात तांत्रिक माहितीच्या आधारे निदा खान संभाजीनगरमध्ये असल्याची खात्री पटली. यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईचे नियोजन केले. पोलिसांनी सलग दोन दिवस त्या संशयास्पद इमारतीवर लांबून नजर ठेवली. आरोपीला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी गणवेश टाळून साध्या वेशातील पथके तैनात केली होती. कारवाईसाठी सरकारी गाड्यांचा वापर न करता, खासगी आणि विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करण्यात आला. निदा खान घरात असल्याची खात्री पटताच रात्री पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या छापा टाकला आणि निदा खानला ताब्यात घेतले.

दरम्यान, निदा खानने गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला. जामीन फेटाळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon