प्रेम, लग्न अन् २८ लाखांची फसवणूक; नवरदेव लग्नानंतरच पसार

प्रेम, लग्न अन् २८ लाखांची फसवणूक; नवरदेव लग्नानंतरच पसार

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या ४० वर्षीय महिलेची ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध निर्माण करून, लग्नाचे आमिष दाखवत तब्बल चार वर्षे लाखो रुपये उकळणाऱ्या आणि विवाहानंतर अचानक पसार झालेल्या एका तरुणाविरोधात नवघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात महिलेची सुमारे २८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

मुलुंड पूर्व येथे राहणारी वासंती (नाव बदलले आहे) ही विक्रोळीतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत असताना तिची ओळख कमलेश दळवी याच्याशी झाली. सुरुवातीला मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली. कमलेशने स्वतःच्या पत्नीचे निधन झाल्याचे सांगत वासंतीची सहानुभूती मिळवली आणि तिच्याशी अधिक जवळीक साधली.

तीन-चार वर्षांच्या ओळखीमुळे वासंतीने त्याच्यावर विश्वास ठेवला. कमलेशने तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत विवाहाचा प्रस्ताव दिला. वासंतीनेही होकार दिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

या काळात कमलेशने विविध कारणे सांगून वासंतीकडून वेळोवेळी पैसे उकळण्यास सुरुवात केली. २०२० ते २०२४ या कालावधीत तिने त्याला सुमारे २० लाख रुपये दिले. त्यानंतर भावाचा अपघात झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगत कमलेशने आणखी पैशांची मागणी केली. त्यावर वासंतीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून जवळपास आठ लाख रुपये त्याला दिले.

यानंतर मुलुंड येथे दोघांचा थाटामाटात विवाह झाला. मात्र लग्नावेळी कमलेशच्या बाजूने एकही नातेवाईक उपस्थित नसल्याने वासंतीला संशय आला. लग्नानंतरही राहण्यासाठी भाड्याने घर घेण्याच्या कारणावरून तो पुन्हा पैशांची मागणी करू लागला. चौकशी केली असता कमलेशकडे स्वतःचे घरही नसल्याचे उघड झाले.

आपले पितळ उघडे पडत असल्याचे लक्षात येताच कमलेश अचानक फरार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वासंतीने नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कमलेश दळवीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon