टिटवाळ्यातील बेपत्ता वृद्ध दाम्पत्याचा मुरबाडमध्ये मृतदेह; मुलीकडून पैशांसाठी छळाचा संशय

टिटवाळ्यातील बेपत्ता वृद्ध दाम्पत्याचा मुरबाडमध्ये मृतदेह; मुलीकडून पैशांसाठी छळाचा संशय

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे : टिटवाळ्यातील सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वयोवृद्ध दाम्पत्याचा मृतदेह मुरबाड तालुक्यातील एका निर्जन ठिकाणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महादू घरत (८५) आणि कमलाबाई घरत (७५) अशी मृतांची नावे असून, मुलीकडून वारंवार पैशांची व संपत्तीची मागणी होत असल्याने मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिलपासून हे दाम्पत्य घरातून बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या मुलीने टिटवाळा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला होता.

शोधमोहीम सुरू असतानाच मुरबाड परिसरातील एका निर्जन ठिकाणी दोघांचे मृतदेह आढळून आले. माहिती मिळताच मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात, मृत दाम्पत्य त्यांच्या मुलीकडून होणाऱ्या त्रासामुळे मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. मुलीकडून वारंवार पैशांची आणि संपत्तीची मागणी केली जात असल्याने ते त्रस्त होते. या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले की, हरवल्याची तक्रार आल्यानंतर दोघांचा शोध सुरू होता. मात्र आता त्यांचे मृतदेह आढळून आले असून पुढील तपास मुरबाड पोलीस करत आहेत.

दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबतही पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वृद्धांवरील वाढत्या मानसिक छळाच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon