तुर्भे जंगलात केबल जाळण्याचा अड्डा उद्ध्वस्त; २५ जण अटकेत, ५ कोटींचा मुद्देमाल जप्त

तुर्भे जंगलात केबल जाळण्याचा अड्डा उद्ध्वस्त; २५ जण अटकेत, ५ कोटींचा मुद्देमाल जप्त

सुधाकर नाडार / प्रतिनिधी

मुंबई : नवी मुंबई येथील तुर्भे एमआयडीसी परिसरालगतच्या जंगलात चोरीच्या केबल जाळून कॉपर काढण्याच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी २५ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चार टेंपोंसह सुमारे ५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) तसेच अन्य कंपन्यांच्या केबल चोरीचे रॅकेट मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात काही काळापासून सक्रिय होते. चोरी केलेल्या केबल तुर्भे एमआयडीसीतील डोंगराळ जंगल भागात नेऊन मोठ्या प्रमाणात जाळून त्यातील कॉपर वेगळा काढण्याचे काम सुरू होते.

या प्रकरणाचा उलगडा ‘दैनिक पोलीस महानगर’च्या पथकामुळे झाला. रिपोर्टर अतिश शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १० टेंपोमध्ये भरलेला केबल जंगलात नेला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी टेंपोचा पाठलाग करत ही माहिती तात्काळ ‘११२’ नियंत्रण कक्षाला दिली.

दरम्यान, तुर्भे पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जंगलात सुमारे एक किलोमीटर आत गेल्यावर मोठ्या प्रमाणात केबल जाळण्याचे प्रकार सुरू असल्याचे आढळून आले. सुमारे २५ ते ३० जणांचा गट २५ हजार चौरस फुटांच्या परिसरात ही बेकायदेशीर कारवाई करत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक टेंपो घटनास्थळी पकडण्यात आला. त्यात जळालेला कॉपर आढळून आला. चौकशीत मुख्य सूत्रधार म्हणून निजाम उर्फ नियाज खान याचे नाव पुढे आले. विशेष म्हणजे, त्याच्या दुचाकीवर ‘POLICE’ असा स्टिकर लावलेला असून तो स्वतःला पोलिसांशी संबंधित वॉर्डन असल्याचे सांगत होता.

यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवत आणखी तीन टेंपो जप्त केले. या सर्व कारवाईत एकूण २५ आरोपींना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या केबलमध्ये सुमारे ७० टक्के एमटीएनएल तर उर्वरित केबल अदानी ग्रुप आणि बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ॲन्ड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) यांसारख्या कंपन्यांचे असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईचे नेतृत्व मिलिंद भारंबे (पोलीस आयुक्त, नवी मुंबई), पंकज दहाने (उपपोलीस आयुक्त, झोन १) आणि तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख यांच्यासह पथक पुढील तपास करत आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील महत्त्वाच्या दळणवळण यंत्रणेवर होणारा संभाव्य परिणाम टळल्याचे मानले जात असून, अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी अधिक कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon