‘खरात प्रकरणात’ बुधवारी मोठा खुलासा?; १८२५ संपर्कांवरून खळबळ, प्रभावशालींचा सहभाग असल्याचा अंजली दमानिया यांचा दावा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदूबाबा अशोककुमार खरात प्रकरणात बुधवारी मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या संपर्कात असलेल्या तब्बल १८२५ जणांची यादी जाहीर करण्याचा इशारा दिल्याने या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.
दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, या संपर्क यादीत आयजी दर्जाचे पोलीस अधिकारी, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर तसेच काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ गुन्हेगारीपुरते मर्यादित नसून, त्याचे धागेदोरे सत्ताकेंद्रांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी सक्तवसुली संचनालय (ईडी) कडून राज्यातील ११ ठिकाणी छापेमारी करण्यात येत असून, आर्थिक व्यवहार व अन्य पुराव्यांचा मागोवा घेतला जात आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात संबंधित काही व्यक्तींची चौकशीही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दमानिया या बुधवारी पत्रकार परिषद घेऊन खरातचे कॉल रेकॉर्ड्स, एसएमएस व्यवहार तसेच कथित राजकीय संबंधांचे पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या खुलाशानंतर प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, अंधश्रद्धेच्या आडून चालणाऱ्या गैरप्रकारांवर तसेच प्रभावशाली व्यक्तींच्या कथित सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, तपास यंत्रणांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.