१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १९ वर्षीय तरुणाकडून अत्याचार; कारंजा ग्रामीण पोलीसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या
योगेश पांडे / वार्ताहर
वाशिम – वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खानापूर गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १९ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्चच्या रात्री पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह जेवण करून झोपण्याच्या तयारीत होती. रात्री ११ वाजेच्या सुमारास मुलीच्या भावाच्या लक्षात आले की त्याची बहीण खोलीत नाही. त्यानंतर वडिलांनी मुलासह मुलीचा शोध सुरू केला असता, घराच्या अंगणातच त्यांना मुलगी जमिनीवर पडलेली दिसली आणि तिच्यासोबत एक तरुण संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
मुलीच्या वडिलांनी आरडाओरडा करताच तो तरुण तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. वडिलांनी जेव्हा आपल्या मुलीकडे चौकशी केली, तेव्हा तिने सांगितले की तो तरुण शेजारच्या गावातील ओळखीचा असून तिला भेटायला आला होता, मात्र त्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली. या धक्कादायक माहितीनंतर वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.
कारंजा ग्रामीण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्रे फिरवली आणि आरोपी तरुणाला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. पोलीस अधिकारी संतोष इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.