रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवार, अजितदादांचे फोटो गायब; केवळ तटकरे कुटुंबाचे फोटो, राजकीय वर्तुळात चर्चा
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरून राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, आणि दिवंगत नेते अजित पवार यांचे फोटो गायब झाले आहेत. या बॅनरवर केवळ सुनील तटकरे आणि कुटुंबियांचे फोटो असल्याचे दिसून येते. या बॅनरची राज्यभरात चर्चा होत आहे. बॅनरवरून पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याने हे कशाचे संकेत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पक्षफोडीचे वेगवेगळे आरोप होत असताना रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, स्वर्गीय अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो बेपत्ता झाल्याचे समोर आले. या घटनेचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील इंदापुर येथे माणगांव तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले. मात्र या बॅनरवर दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आले नव्हते. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठी बेपत्ता होत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित दादांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनचेच मनसुबे लपवून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगड पासून झाली आहे. आदरणीय अजित दादांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव किंवा फोटो सुद्धा नाही. याला कृतघ्नता म्हणतात, अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.
अजितदादांनी यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर अनेक वर्षे ठेवल्यामुळे यांची राज्य पातळीवर प्रतिष्ठा वाढली. यांनी पक्षांतर्गत ओबीसी मराठा असा जातीयवाद सुद्धा वाढवलेला आहे. जे अजितदादांना पटत नव्हते. सुनील तटकरे तुमच्यात हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष प्रफुल पटेल यांना सोबत घेऊन काढावा. किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार आहात तर तुमची चार चौकडी घेऊन तुम्ही जावे. तुमच्या कृतघ्नतेचा तीव्र निषेध, असे लवांडे म्हणाले.