पुण्यात हळदीच्या पाकिटांतून गांजाची तस्करी; पोलिसांकडून दोन भावांना बेड्या, १६ किलो गांजा जप्त

Spread the love

पुण्यात हळदीच्या पाकिटांतून गांजाची तस्करी; पोलिसांकडून दोन भावांना बेड्या, १६ किलो गांजा जप्त

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – पुण्यातील उच्चभ्रू बाणेर परिसरात हळदीच्या पाकिटांच्या आडून गांजाची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात बाणेर पोलिसांनी अभिषेक भिका बोरसे आणि अक्षय भिका बोरसे या दोघांना अटक करत तब्बल १६ किलो गांजा जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात दोन तरुण दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महापालिकेच्या जलतरण तलावाजवळ सापळा रचला. संशयितांना अडवून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील पिशवीत हळदीची पाकिटे आढळून आली.या पाकिटांची तपासणी केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. कारण हळदीच्या नावाखाली या पाकिटांमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३ किलो गांजा जप्त केला. चौकशीदरम्यान आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील त्यांच्या घरात आणखी अमली पदार्थ साठवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकत आणखी १३ किलो गांजा जप्त केला. अशा प्रकारे एकूण १६ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली असून ते हळदीच्या पाकिटांचा वापर करून गांजाची विक्री करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon