गॅस सिलिंडरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक; चेंबूर पोलिसांची झोपडपट्ट्यांत जनजागृती मोहीम

Spread the love

गॅस सिलिंडरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक; चेंबूर पोलिसांची झोपडपट्ट्यांत जनजागृती मोहीम

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा गैरफायदा घेत नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्याच्या घटना शहरात वाढत असून, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जनजागृतीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पूर्व उपनगरातील चेंबूर परिसरात पोलिसांकडून झोपडपट्टी भागात ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क केले जात आहे.

इराण-इस्रायल संघर्षामुळे देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी नागरिकांना सिलिंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत सायबर भामटे नागरिकांना बनावट संदेश पाठवून ओटीपी मागत आहेत. काही प्रकरणांत बनावट लिंकद्वारे ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले जाते. संबंधित लिंकवर क्लिक करताच मोबाईलचा ताबा घेत काही मिनिटांतच बँक खात्यातील रक्कम लंपास केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांत वाढ झाली असून अनेक नागरिक आर्थिकदृष्ट्या फसले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी जनजागृतीवर भर दिला आहे.

चेंबूर पोलिस ठाण्याच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून विविध भागांत मोहीम राबवण्यात येत आहे. विशेषतः झोपडपट्टी भागात ध्वनिक्षेपकाद्वारे ओटीपी न देणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे आणि अधिकृत स्त्रोतांवरच व्यवहार करणे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी दिली.

दरम्यान, संशयास्पद कॉल, संदेश किंवा लिंक आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon