मुलुंड परिमंडळात ‘मालमत्ता प्रदान’ कार्यक्रम; गुन्ह्यांतील जप्त सुमारे एक कोटींची मालमत्ता तक्रारदारांना परत
रवि निषाद / मुंबई

मुंबई : गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली मालमत्ता संबंधित तक्रारदारांना परत देण्यासाठी मुलुंड परिमंडळात विशेष ‘मालमत्ता प्रदान’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुमारे एक कोटी रुपयांच्या किंमतीच्या विविध वस्तू संबंधित मालकांना परत करण्यात आल्या.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम परिमंडळ स्तरावर आयोजित करण्यात आला. शुक्रवारी (१३ मार्च) सायंकाळी साडेपाच वाजता मुलुंड पश्चिम येथील ‘द क्राउन बँक्वेट हॉल’, विकास सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांचीही उपस्थिती होती.
मुलुंड परिमंडळ ७ अंतर्गत येणाऱ्या आठ पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान हस्तगत केलेली मालमत्ता या वेळी तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आली. यात मोबाईल फोन, सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच रॉयल एनफिल्ड बुलेटसारख्या दुचाकी वाहनांचा समावेश होता.
पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी सांगितले की, मुलुंड, नवघर, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी कन्नमवार नगर, पार्कसाइट, घाटकोपर आणि पंतनगर या पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यांमधून हस्तगत केलेली सुमारे एक कोटी रुपयांची मालमत्ता तक्रारदारांना परत करण्यात आली.
या कार्यक्रमाला परिमंडळातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच अनेक तक्रारदार उपस्थित होते.