कर्जत स्थानकातून ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण; २.१५ लाखांचा ऐवज लुटला, महिलेसह दोघे अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करून त्यांना एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी मुख्य सूत्रधार असलेल्या महिलेसह दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी सुनील दयाराम गजघाटे (वय ६१) यांना आरोपी आदिती ढोके हिने भेटीच्या बहाण्याने कर्जत रेल्वे स्थानक येथे बोलावले होते. ते ठरल्याप्रमाणे स्थानक परिसरात पोहोचल्यानंतर आदिती ढोके हिने तिचे साथीदार सुशील जाधव आणि गणेश प्रधान यांच्या मदतीने त्यांचे अपहरण केले. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास आरोपींनी गजघाटे यांना जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून परिसरात फिरवले.
त्यानंतर त्यांना आदिती ढोके राहत असलेल्या फ्लॅटमध्ये नेऊन बंदिस्त ठेवण्यात आले. आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या जवळील मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. ८ ते ९ मार्चदरम्यान घडलेल्या या घटनेत आरोपींनी दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, दोन सोन्याच्या अंगठ्या, १५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण सुमारे २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय आरोपींनी गजघाटे यांच्याकडून एटीएम कार्डचा पिन जबरदस्तीने मिळवून खात्यातील रक्कम काढली. तसेच त्यांच्या क्रेडिट कार्डचाही वापर करून विविध खरेदी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड आणि पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास सुरू आहे.