मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची लाखो रुपयांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री यांना मोठा धक्का बसला आहे. वर्षा उसगांवकर यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांच्यासह अनेक अभिनेत्रींची जवळपास ४७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली आहे. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शक तसेच बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तक्रार दाखल केली, ती मृणालीनी सुभाष जांभळे अभिनेत्री असून तिने मराठी रंगभूीमीवर तसेच चित्रपटात काम केलं आहे. संशयित आरोपी अविनाश जाधव यांच्याशी तिची व्यावसायिक ओळख होती. आपण चित्रपट निर्माता व बिल्डर असल्याचे जाधव यांनी सांगितलं होतं. डोंबिवली येथील प्रकल्पात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देईन, असं आश्वासन त्याने दिलं होतं. एवढंच नव्हे तर वर्षभरात मूळ रक्कम परत देईन, असा दावाही त्याने केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं.
त्यानुसार, नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीमध्ये तक्रारदार मृणालिनी आणि तिच्या ओळखीने, प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा ऊसगांवकर, तसेच आणखी तीन जणांनी मिळून चेक आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण ४७ लाख रुपयांची गुंतवणूक जाधव यांच्याकडे केली. त्यानंतर सुरूवातीला जाधव यांनी परतावा म्हणून सुमारे साडेचार लाख दिले. मात्र त्यानंतर काही काळाने त्याने परतावा, रिटर्न्स देणं बंदच केलं. मृणालिनी, वर्षा उसगावकर व इतरांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला, पैसे मागण्याचा प्रयत्न केला. पण जाधवने काही दाद दिली नाही, उलट तो मोबाईल क्रमांक आणि त्याचा पत्ता , दोन्ही बदलत राहिला.
अखेर तक्रारदारांनी डोंबिवली गाठली आणि जाधवला गाठत पैशांबद्दल विचारणा केली, जाब विचारला. त्यावर त्याने “ मी पैसे देणार नाही, जे काय करायचं ते करा” अशा अरेरावीच्या शब्दांत, उर्मट स्वरांत उत्तर दिलं, धमकी दिली, असा आरोप तक्रादारांनी केला आहे. आपली व सहकाऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व तक्रारदारांनी २६ फेब्रुवारी रोजी, दादर शिवाजी पार्क पोलिस ठाणं गाठलं आणि संशयित आरोपी जाधव याच्याविरोधात फिर्याद नोंदवली. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश शेजुळ यांच्याकडे सोपवण्यात आला असून ते कसून चौकशी करत आहेत.