चोरीच्या संशयावरून ४ सुरक्षा रक्षकांकडून अज्ञात तरुणाची हत्या; पोलीसांनी चौघांना घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरातील हमालवाडा येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका गूढ मृत्यूचा सातारा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने उलगडा केला आहे. मराठवाडा स्पन पाईप कंपनीत १८ फेब्रुवारी रोजी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक वाटत असला तरी, वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत हा प्रकार थंड डोक्याने केलेला खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या चार सुरक्षा रक्षकांना बेड्या ठोकल्या आहेत.
ऋषिकेश बबन वक्ते (२५), रोहित संतोष नगराळे (१९), चंद्रकांत भाऊसाहेब मारकळ (२१), राहुल बाबूराव दुतोंडे (२४), सर्व राहणार खंडोबा मंदिराजवळ, सातारा, अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक राहुल दुतोंडे हा कंपनीत कर्तव्यावर असताना त्याला वायर चोरी करण्यासाठी एक अज्ञात तरुण आल्याचा संशय आला. त्याने तात्काळ आपले इतर साथीदार ऋषिकेश वक्ते, रोहित नगराळे आणि चंद्रकांत मारकळ यांना बोलावून घेतले. या चौघांनी मिळून त्या तरुणाला पकडले आणि चोरीच्या संशयावरून त्याला टणक तसेच बोथट शस्त्रांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की त्या अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. प्राथमिक अहवालात शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचे स्पष्ट झाले.सहाय्यक निरीक्षक शैलेश देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी तातडीने या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेला दहा दिवस उलटून गेले असूनही मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तो तरुण नक्की कोण होता आणि तो कंपनीत कोणत्या उद्देशाने आला होता, याचा तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा रक्षकांच्या वर्तणुकीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.