न्यायालयीन वादातून महिला वकिलांची हाणामारी; डोक्याला गंभीर जखम

Spread the love

न्यायालयीन वादातून महिला वकिलांची हाणामारी; डोक्याला गंभीर जखम

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालय परिसरात दोन महिला वकिलांमध्ये वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची गंभीर घटना घडली. या झटापटीत एका महिला वकिलाच्या डोक्यावर टोकदार वस्तूने वार झाल्याने गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वकील (वय ४२, रा. भवानी पेठ) गेल्या दीड वर्षांपासून शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात वकिली करीत आहेत. न्यायालयीन प्रकरणे अधिक प्रमाणात मिळत असल्याच्या कारणावरून संबंधित दोन महिला वकिलांशी त्यांचा यापूर्वीही वाद झाला होता.

घटनेच्या दिवशी संबंधित वकिलांनी फिर्यादीस शिवीगाळ करत दिवसभर पाठलाग केला. “आज कुणालाही काम करू देणार नाही, पैसे कमवू देणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दुपारनंतर पुन्हा वाद उफाळून आला. न्यायालयाबाहेर पडत असताना एका आरोपीने फिर्यादीच्या पाठीवर बुक्की मारली. त्यानंतर दोघींमध्ये झटापट झाली. केस ओढणे, हातघाई अशी मारहाण सुरू असतानाच दुसऱ्या महिला वकिलानेही मारहाण केल्याचा आरोप आहे.

झटापटीदरम्यान एका महिला वकिलाने टोकदार वस्तूने फिर्यादीच्या डोक्यावर वार केल्याने त्यांना गंभीर जखम झाली व रक्तस्राव सुरू झाला. चक्कर आल्याने सहकाऱ्यांनी त्यांना आधार दिला. न्यायालयातील नर्सकडून प्राथमिक उपचार करून त्यांना रास्ता पेठ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon