वर्दीचा गैरवापर खपवून घेणार नाही; ड्रग तस्करीत सहभागी पोलीस थेट बडतर्फ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राज्यात अंमली पदार्थांविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात आला असून, ड्रग तस्करीत पोलिस कर्मचारी सहभागी आढळल्यास त्यांना निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ केले जाईल, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिला. वर्दीचा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
अधिवेशनात अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रकरणांवर चर्चा सुरू असताना फडणवीस यांनी ‘शून्य सहनशीलता’ धोरणाची घोषणा केली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच कायदा मोडल्यास त्यांच्यावर दुप्पट कठोर कारवाई करण्यात येईल. निलंबन हा पर्याय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्यात ड्रग्सविरोधी कारवाया व्यापक प्रमाणात राबवण्यात येत असून, तस्करीची साखळी मोडण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील कोणत्याही व्यक्तीला अशा गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्यास कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण दिले जाणार नाही. दोष सिद्ध होण्याआधीच थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
या भूमिकेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, अंतर्गत शिस्त अधिक कडक करण्याच्या दिशेने पावले उचलली जाणार आहेत. प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे आणि पोलिस दलाची प्रतिमा स्वच्छ राखणे, हा सरकारचा स्पष्ट उद्देश असल्याचा संदेश अधिवेशनातून देण्यात आला.
अंमली पदार्थांविरोधातील लढ्यात आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत शासनाने वर्दीतील प्रत्येक कर्मचाऱ्याला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.