‘रेबीज मुक्त ठाणे’ मोहिमेचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि प्राणीमित्र संस्थांच्या सहकार्याने ‘रेबीज मुक्त ठाणे’ ही विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी महापालिका मुख्यालयात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी उपायुक्त मनिष जोशी, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका मीनल संख्ये, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर तसेच मोहिमेसाठी नियुक्त विशेष पथकाचे सदस्य उपस्थित होते.
‘रेबीज मुक्त ठाणे’ या योजनेअंतर्गत ५० जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून, सात दिवसांत सुमारे ५ हजार भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली. लसीकरण झालेल्या कुत्र्यांच्या ओळखीसाठी त्यांच्या गळ्यात केशरी रंगाचा रिफ्लेक्टर पट्टा बांधण्यात येणार आहे.
येत्या महिनाभरात २५ हजार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून, ही मोहिम पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.