पालघरमध्ये भीषण अपघात; बाजार करून परतणाऱ्या दोन महिला ठार
पालघर / नवीन पाटील
पालघर शहरात भरधाव पीकअप टेम्पोच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २०) दुपारी घडली. बाजार करून घरी परतणाऱ्या महिलांना मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
लता निलेश तरे (४५, रा. पिल्हेरपाडा, नंडोरे) आणि बेबी चंद्रकांत जाधव (६५, रा. नवापाडा, नंडोरे) अशी मृत महिलांची नावे आहेत. शुक्रवारची सुट्टी असल्याने दोघीही पालघर बाजार करून नंडोरेकडे पायी जात असताना नंडोरेकडून नवापाडा परिसरात हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उजव्या बाजूने चालत असताना, शिकाऊ चालकाच्या ताब्यातील भरधाव पीकअप टेम्पोचे नियंत्रण सुटले आणि वाहन डाव्या बाजूने उजवीकडे येत दोघींना मागून धडकले.
धडक इतकी भीषण होती की दोघी गंभीर जखमी झाल्या. लता तरे यांना पालघर ग्रामीण रुग्णालयात, तर बेबी जाधव यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघींनाही मृत घोषित केले.
अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पीकअपमध्ये दोन जण असल्याची माहिती असून २४ वर्षीय शिकाऊ चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पालघर पोलीस करीत आहेत.