धनंजय मुंडेंवर महिलेचे गंभीर आरोप; ‘मुंडेंसमोरच पिस्तूल लावल्याचा’ दावा

Spread the love

धनंजय मुंडेंवर महिलेचे गंभीर आरोप; ‘मुंडेंसमोरच पिस्तूल लावल्याचा’ दावा

पोलीस महानगर नेटवर्क

बीड : धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी उल्लेख केलेल्या रंजना नागपूरकर यांनी माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आर्थिक फसवणूक आणि धमकीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नागपूरकर यांनी सांगितले की, पतीला पुन्हा नोकरीत रुजू करून देण्यासाठी मुंडे यांनी पैशांची मागणी केली होती. “मी १७ लाख रुपये दिले,” असा दावा त्यांनी केला. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर पैसे परत मागण्यासाठी परळीत गेले असता “धनंजय मुंडेंसमोरच माझ्या गळ्याला पिस्तूल लावण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला आहे.

नागपूरकर यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्यांदा पैसे देताना त्या परळीत मुंडे यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी मुंडे उपस्थित होते आणि “काम होईल,” असे सांगण्यात आले. नंतर पैसे गेले तरी काम होत नसल्याचे लक्षात आल्यावर त्या पुन्हा परळीत गेल्या. त्या वेळी निखिल फड, कैलास फड आणि धनंजय मुंडे घरी उपस्थित होते. “तेव्हाच माझ्या गळ्याला बंदूक लावून ‘पुन्हा आलीस तर गाडून टाकू’ अशी धमकी देण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आपण तेथे जाणे थांबवले, असेही नागपूरकर यांनी सांगितले.

दरम्यान, मुंडे यांचे समर्थक अविनाश नाईकवाडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन अनेकजण स्वतःचा स्वार्थ साधतात. विनाकारण बदनामी करू नका. पैसे दिले असतील तर ते मुंडे यांनाच दिले आहेत, असे सिद्ध करा. बीडला या, सत्यता पडताळू,” अशी प्रतिक्रिया नाईकवाडे यांनी दिली.

या प्रकरणावर पुढील घडामोडींंकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon