बनावट ‘टेल्मा एएम’ विक्रीप्रकरणी दोघांना अटक; ८.९४ लाखांचे औषध जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : बनावट रक्तदाबावरील ‘टेल्मा एएम’ (Telmisartan 40 mg व Amlodipine 5 mg) गोळ्या मूळ उत्पादकाच्या नावाखाली विक्री केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशन पोलिसांनी कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ८ लाख ९४ हजार ४०० रुपये किमतीच्या २,७९५ स्ट्रिप्स जप्त करण्यात आल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाने २० जानेवारी रोजी छापा टाकून ‘श्रीराम फार्मा’ या औषध विक्री परवान्याअंतर्गत बनावट गोळ्या विकल्या जात असल्याचा पर्दाफाश केला. आरोपी पंकज राधेश्याम उपाध्याय (३३, व्यवसाय : डिस्ट्रीब्युटर, रा. दावडी, डोंबिवली पूर्व) याने औषध बनावट व मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे माहिती असूनही मूळ उत्पादकाचे असल्याचे भासवून विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून उपाध्याय याला २१ जानेवारीला अटक करण्यात आली. पुढील तपासात ही बनावट औषधे विवेक अजयकुमार राय (३५, रा. कांदिवली पूर्व, मुंबई) पुरवीत असल्याचे उघड झाल्याने त्यालाही १६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक करत असून पुढील तपास सुरू आहे.