ज्येष्ठ नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी टीएमटीकडून डिजिटल पासचा शुभारंभ

Spread the love

ज्येष्ठ नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी टीएमटीकडून डिजिटल पासचा शुभारंभ

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांचा बसप्रवास अधिक सुलभ, सोपा आणि सन्मानपूर्वक व्हावा, या उद्देशाने ठाणे महानगरपालिकाच्या परिवहन विभागामार्फत ६० वर्षे व त्यावरील नागरिकांसाठी डिजिटल पास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत डिजिटल पासचे वितरण गुरुवारी (१८ फेब्रुवारी २०२६) महापौरांच्या दालनात करण्यात आले.

या कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ११ ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल पास प्रदान करण्यात आले. या वेळी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले.

राज्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य बसप्रवासाची योजना यापूर्वी सुरू करण्यात आली होती. त्या योजनेअंतर्गत वयाचा पुरावा दाखवून ‘झिरो तिकीट’ देण्यात येत होते. त्याच धर्तीवर आता अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीसाठी डिजिटल पास प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल पास देण्यात येणार आहेत.

डिजिटल पास मिळेपर्यंत जुन्या पद्धतीने झिरो तिकीट दिले जाणार असल्याचेही परिवहन विभागाने स्पष्ट केले. या उपक्रमामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, वेळेची बचत आणि गैरसोयी कमी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास उपायुक्त मनीष जोशी, परिवहन उपव्यवस्थापक सुनील जाधव, वाहतूक अधीक्षक रमेश बांदल, आगार व्यवस्थापक सुनील साठे, सहायक वाहतूक अधीक्षक हेमंतकुमार शिंदे, टीएमटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

डिजिटल प्रणालीमुळे प्रवास अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सन्मानपूर्वक होणार असल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त करत महापालिकेचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon