बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; बंद खोलीत डांबलेल्या चार अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करीचा संशय

Spread the love

बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; बंद खोलीत डांबलेल्या चार अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करीचा संशय

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी बुधवारी केलेल्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका बंद खोलीत डांबून ठेवलेल्या चार अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुटका केली असून, या प्रकरणात मानवी तस्करीचा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस कारवाईदरम्यान संबंधित इमारतीतील एका खोलीला बाहेरून मोठे कुलूप लावलेले आढळून आले. चौकशी केली असता आत जुने सामान असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संशय बळावल्याने पोलिसांनी सक्तीने दरवाजा उघडला असता आत चार अल्पवयीन मुली आढळून आल्या. छापेमारीदरम्यान काही ग्राहक आणि इतर महिलांना ताब्यात घेण्यात आले होते; मात्र या मुलींना जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले.

सुटका केलेल्या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता सुरुवातीला दोन मुलींनी त्यास नकार दिला. त्यानंतर उरलेल्या दोन मुलींचे कथित पालक म्हणून समोर आलेल्या व्यक्तींनीही तपासणीला विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि वैद्यकीय तपासणीसाठी परवानगी मिळावी, यासाठी पोलिसांनी चाइल्ड वेलफेअर कमिटी (CWC) कडे पत्रव्यवहार केला आहे.

तपासात आणखी गंभीर बाबी समोर आल्या आहेत. मुलींचे पालक असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींकडे ओळख किंवा नातेसंबंधाचे कोणतेही अधिकृत पुरावे नसल्याचे आढळले. कथित पालक व मुली यांच्यात साम्य न दिसणे आणि वागणुकीतील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आहे. या मुली परिसरातील शाळेत शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले असले, तरी त्याबाबत कोणतेही शैक्षणिक कागदपत्र सादर करण्यात आलेले नाही. सध्या मुलींचे समुपदेशन सुरू असून, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

या प्रकरणी मानवी तस्करीविरोधी कायद्यासह अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारवाईदरम्यान दोन बांगलादेशी महिला बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचेही उघड झाले. त्यांच्याकडे सापडलेली आधार कार्ड बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या अवैध व्यवसायांना काही पोलिस कर्मचाऱ्यांचे अभय असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. नियमित हप्तेगोळा किंवा केवळ दिखाऊ कारवाई करणारे कर्मचारी रडारवर आले असून, एकाच ठिकाणी दीर्घकाळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच दलालांशी असलेल्या संपर्काची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon