तळेगाव दाभाडे परिसरात अनैतिक व्यवसायाविरुद्ध कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
तळेगाव दाभाडे : पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमाटणे फाटा ते तळेगाव रोडवरील गोपळे सायकल टाऊनजवळ करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करून अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पथकाने सापळा रचून कारवाई केली. तपासादरम्यान आरोपींच्या कृत्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी पो.हवा. उदयकुमार बाळासाहेब भोसले (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष) यांनी फिर्याद दिली आहे. परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत असून, संबंधित नेटवर्कबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.